मंगळवार, १० सप्टेंबर, २०२४

समथिंग - एक थरकापवणारी भयकथा

 

पुस्तकाचे नाव : समथिंग

लेखक : सुहास शिरवळकर

मला समथिंग का आवडते त्याची अनेक कारणे आहेत.

१. इतर भयकथा मधून जे दिसते ते हिरवे डोळे, अक्राळ विक्राळ लोंबत्या मांसाचे चेहरे... असे कोणतेही उल्लेख समथिंग मध्ये नाहीत. असे असूनही एक भयाण वातावरण निर्मिती करणे हे सुशिंचे मोठे कसब मानतो मी.

२. दोन जुळ्या भावांची समानता व वैचारिक कनेक्टिव्हिटी या मानसिक गोष्टीचा मस्त वापर समथिंग मध्ये आहे.

३. दानिश या भावाचा गूढ मृत्यू होतो आणि दुसरा भाऊ त्याच्या लग्न झालेल्या बायकोला पहिल्यांदा भेटतो. आणि सुरू होतें एक थरकापवणारे एक जबरदस्त नाट्य.

४. रात्रीच्या वेळी भयकथा वाचून भय निर्माण करणाऱ्या अनेक कथा आहेत. पण समथिंग दिवसा वाचताना देखील अंगावर काटा येतो जो इतर भयकथा वाचताना येत नाही. आणि समथिंग तुम्ही रात्री वाचून बघाच. कशी हालत होते ते 😜😜

५. साहित्य मूल्याच्या दृष्टिकोनातून देखील समथिंग एक वेगळी कादंबरी ठरते.

६. काळी मांजर आणि गूढ पद्धतीने येणारी भावाची बायको लिझ एक थरकाप उडवते

७. गावातील एकामागोमाग एक विचित्र घटना वाचकांना भयभीत करतात.

एवढी बलस्थाने सांगितल्यावर कथेची ओळख मुद्दाम करून देत नाहीये. कारण एकदा कादंबरी सुरू झाली की पानोपानी  निर्माण होणारी उत्कंठा तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. आणि ती उत्कंठा शांत करण्यासाठी समथिंग ही कादंबरी तुम्ही पूर्ण वाचणारच 😁

काय मग वाचताय समथिंग रात्रीच्या वेळी ?? केव्हाही वाचा. अनुभव सुंदर येईल याची खात्री आहे.

मृत्युरेखा : तमिळ वाघांच्या अंतरंगातील सत्य उलगडणारी थरारकथा

 

मृत्युरेखा : तमिळ वाघांच्या अंतरंगातील सत्य उलगडणारी थरारकथा








मराठी साहित्य विश्वात थरारकथांना एक वेगळे परिमाण देणारे लेखक श्री. संजय सोनवणी यांची "मृत्युरेखा" ही तशी जुनी कादंबरी. त्यात अजून सुधारणा करुन त्यांनी हीच कादंबरी इंग्रजीतून "On the Brink of Death" पुन्हा लिहिली व त्याचे इंग्रजी वाचकही या कादंबरीचे कौतुक करतात. असो. आपण मराठी "मृत्युरेखा" कादंबरीचा वेध घेऊयात.

कादंबरी सुरु होते तेव्हा भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या एलटीटीई ने घडवून आणलेली असते. श्रीलंकेच्या बाजूने शांतीसेना पाठवून राजीव गांधींनी (एलटीटीई च्या मते) त्यांनी मोठी चूक केलेली असते. निवडणुकीच्या प्रचार दौर्यासाठी राजीव गांधी आलेले असताना त्यांची हत्या करुन एलटीटीईने सूड उगवलेला असतो. अशा पार्श्वभूमीवर एक सर्वसामान्य आयुष्य जगत असलेला एक इंजिनिअर वडिलांच्या आकस्मिक मृत्युमुळे वडिलांचा मासेमारीचा व्यवसाय चालवण्यासाठी सरकारी नोकरी सोडून देतो व ट्रॉलर च्या साहाय्याने उपजिविका करत असतो. हा आपल्या कादंबरीचा सर्वार्थाने नायक. एक सामान्य जीवन जगत असलेला व स्वतःच्या गर्भवती पत्नीसह सुखी संसाराची स्वप्ने बघणारा वेणू एलटीटीईच्या प्रभाकरन ने विणलेल्या एका भयंकर जाळ्यात अडकतो. वेणू त्या जाळ्यातून सुटतो का? कृष्णनचे पुढे काय होते? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे थरारक आणि अतिशय वेगवान कथानकात मिळतात.  

"मृत्युरेखा" ही मनाला अनेक आंदोलने देणारी कादंबरी आहे असे मी मानतो. कादंबरीच्या नायकाला अनेक दिव्यातून जावे लागते. स्वतःच्या गर्भवती बायकोला गर्भासकट जिवंत जाळण्यात येते,  अत्यंत विश्वासू वर्तुळात असलेल्या कृष्णनसारख्या हस्तकांना प्रभाकरन सारख्या दहशतवादी प्रवृत्ती केवळ स्वतःचे स्थान टिकवण्याच्या भीतीपोटी बळी देतात. दहशतवादाच्या मुळाशी असलेले हे भयंकर मानसशास्त्र लेखकाने अतिशय ताकदीने मांडले आहे. इतिहासाकडे दृष्टीक्षेप टाकल्यास हिटलर, मुसोलिनी, सद्दाम हुसेन वा कोणीही हुकुमशहा असो, त्यांनी अनेकांचे बळी घेतलेले आहेत हेच सिद्ध होते. 
 अतिशय खिळवून ठेवणारी हि कादंबरी म्हणजे मृत्युरेखा . अवश्य वाचा 

पुस्तक परिचय : स्टीव्ह जॉब्स एक झपाटलेला तंत्रज्ञ !

 

पुस्तकाचे नाव : स्टीव्ह जॉब्स एक झपाटलेला तंत्रज्ञ !
लेखक : अच्युत गोडबोले आणि अतुल कहाते
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस 
पृष्ठ संख्या : १५२
किंमत : १५० रुपये (₹)
माझे पुस्तकाचे रेटिंग :  ⭐⭐⭐ (५ पैकी)

नुकतेच स्टीव जॉब्स यांची चरित्रात्मक ओळख करून देणारे सदर पुस्तक वाचले.  सदर पुस्तक अवघ्या ८ दिवसात पूर्ण केल्याचा लेखकांनी स्वतःच्या क्षमते बद्दल आणि रात्रीचा दिवस काम करून झपाटून काम केल्याबद्दल गौरवपूर्ण उल्लेख मनोगत मध्ये केला आहे. ते वाचून वाचकाच्या मनात पुस्तकाबद्दल एक अपेक्षांची छान प्रतिमा निर्माण होते.  
८ दिवसांत झपाट्याने काम करून पुस्तक पूर्ण केल्याबद्दल लेखक द्वयींचे परिश्रम घेतल्याबद्दल अभिनंदन. 
आता वळूयात पुस्तकाच्या दर्जाकडे माझ्यामते हे स्टीव्ह जॉब्स आणि ऍपल कंपनीची ओळख करून देणारे हे चांगले पुस्तक आहे. पण घाईघाईने पुस्तक बाजारात आणण्याच्या नादात हे पुस्तक पुरते फसले आहे. कसे ते थोडक्यात बघुयात. 
१. संपूर्ण पुस्तक ज्याच्यावर आहे तो स्टीव्ह जॉब्स वयाच्या कितव्या वर्षी मेला हे पुस्तकात कुठेही दिसले नाही. विशेष म्हणजे स्टीव्ह जॉब्स च्या खऱ्या वडिलांच्या ८० व्या वर्षी मेला हे त्यात आले आहे. 
२. पुस्तकात एके ठिकाणी प्रूफ रीडिंग करताना स्टीव्ह जॉब्स आणि ऍपल हे योग्य शब्द असल्यामुळे ऍपल ने म्हटले असे छापले गेले आहे. ते स्टीव्ह जॉब्स ने म्हटले असे हवे होते. 
३. बोर्डरूम पुस्तकातून काही प्रमाणात उचलेगिरी केल्याचे लेखकांनी स्वतःच सांगितले आहे. पण हे पुस्तक वाचून पूर्ण झाल्यावर वाचकाला जे कळते ते हे की ऍपल कंपनी सोडावी लागली आणि ती पुन्हा मिळवण्यासाठी स्टीव्ह जॉब्स ने कसा संघर्ष केला , त्याचे मार्केटिंग आणि विक्री कौशल्य कसे अचंभित करणारे होते. वगैरे सर्व कॉर्पोरेट क्षेत्राची ओळख करून दिल्या सारखे दिसते. एकूण बोर्डरूम  पुस्तकाचा प्रभाव पूर्ण पुस्तकावर दिसतो आणि स्टीव्ह जॉब्स या व्यक्तीचे कर्तृत्व दुय्यम दिसते. 
४. कॅलिग्राफी हा मुद्दा खूप महत्त्वाचा होता पण तो तितक्या परिणामकारक रित्या लेखकांना मांडता आला नाही. उदाहरण द्यायचे झाले तर ऍपल च्या प्रॉडक्ट्स साठी जी पांढरी शेड एक खास ऍपल ची म्हणून ओळख आहे त्या शेड साठी स्टीव्ह जॉब्स ने ऍपल मधील तज्ज्ञांना खूप फैलावर घेतले होते. जॉब्स ला जी शेड हवी होती ती मिळाल्यावरच त्याने प्रोडक्शन साठी परवानगी दिली होती. हीच गोष्ट त्याने सर्व ठिकाणी केली आहे. 
यावरून स्पष्ट होते की स्टीव्ह जॉब्स हा फक्त उत्पादन छान दिसणे यावर फोकस करून विकणारा नव्हता तर बुद्धिमत्तेच्या कसोटीवर ऍपल ची उत्पादने सर्वश्रेष्ठ आणि काळाच्या पुढील ठरतील यासाठी त्याचे प्रयत्न होते.
५. एकूणच पुस्तकातून स्टीव्ह जॉब्स ची प्रतिमा उत्कृष्ट विक्रेता म्हणून निर्माण झालेली आहे जी चुकीची आहे. कदाचित जॉब्स चे महिमा गान करताना लेखकांच्या नकळत असे झालेले असू शकेल. पण जॉब्स हा उत्कृष्ट विक्रेता नव्हता तर उत्कृष्ट उत्पादने निर्माण करणारा होता. आणि की उत्पादने जशी बनवलेली आहेत तशीच ती लोकांसमोर सोप्या पद्धतीने तो मांडायचा. मुळात मालात दम असेल तर ग्राहक विकत घेतोच घेतो हा त्याचा मुख्य दृष्टिकोन होता. 
आणि हा मूळ दृष्टिकोन मांडून स्टीव्ह जॉब्स ची एक  बुध्दीमान आणि दर्जेदार उत्पादने निर्माण करणारा कुशल तंत्रज्ञ ही प्रतिमा निर्माण करण्यात हे पुस्तक काहीसे भरकटल्या सारखे वाटते. 
एकूण पुस्तक नक्कीच वाचनीय आहे. पण ऍपल या कंपनीच्या इतिहासाची आणि कॉर्पोरेट युद्धाची सावली पुस्तकावर पडल्यामुळे स्टीव्ह जॉब्स चे कर्तृत्व जरासे झाकोळले गेल्यासारखे झाले आहे एवढेच. सुदैवाने स्टीव्ह जॉब्स चे अधिकृत चरित्र देखील मराठीत उपलब्ध झालेले आहे. ते वाचकांनी अवश्य वाचावे. म्हणजे मी काय म्हणतो आहे हे वाचकांच्या सहज लक्षात येईल. 

कथासारित्सागर एक अद्भुत प्राचीन ग्रंथ

 

 


मूळ ग्रंथ बृहत्कथा हा महाकवी गुणाढ्य याने इसवीसना पूर्व पहिल्या ते इसवीसना नंतर पहिल्या शतकाच्या काळात कधीतरी लिहिला याबद्दल विद्वानांत एकमत आहे. महाभारता पेक्षाही श्रेष्ठ असा हा ग्रंथ मूळ स्वरूपात उपलब्ध नाही. कथेप्रमाणे राजाने महाकवी गुणाढ्य याला राज्याबाहेर हाकलून दिल्यावर त्याने प्रत्येकी एक लक्ष श्लोक याप्रमाणे सात विद्याधरांच्या कथा रचून प्राकृत पैशाची भाषेत मूळ ग्रंथ लिहिला. राजाने ग्रंथ नाकारल्यामुळे ग्रंथाचे वाचन जंगलात करून तो एकेक पान महाकवी गुणाढ्य जाळत होता. सर्व प्राणिमात्र तहान भूक विसरून हा अद्भुत ग्रंथ ऐकत होते. शिकार्यांना राजासाठी सकस मांस मिळत नसल्यामुळे  राजाने शोध करविला आणि त्याच्या लक्षात महाकवी गुणाढ्य याची महती लक्षात आली. तेव्हा राजाने त्याला थांबवले. तोपर्यंत सहा विद्याधर कथा आग्नेय स्वाहा झालेल्या होत्या. उरलेल्या एक लक्ष श्लोक संख्येची एकच नरवाहन दत्त या विद्याधर राजाची कथा शिल्लक उरली.

पुढे इसवीसनच्या नंतर ११ व्या शतकात काश्मीर येथील एका पंडिताने बृहत् कथेचा संस्कृतात अनुवाद केला. तो आपल्याला उपलब्ध झाल्यामुळे आज कथासारित्सागर या नावाने महाकवी गुणाढ्य याची मूळ बृहत् कथा आपल्याला वाचावयास मिळते आहे.

इंग्रज अधिकारी एम. एन. पेंझेर यांना हा अमूल्य ग्रंथ मिळाला. त्यांनीं तो सविस्तर इंग्रजीत दहा खंडांतून अनुवादित केला आहे. मराठीत वरदा प्रकाशन च्या ह. अ. भावे यांनी ५ खंडांत कथासरित्सागर मराठीत आणले आहे. याही आधी मराठी अनुवाद उपलब्ध होते. पण ते जुन्या मराठीत आणि संक्षिप्त केले असल्यामुळे कालबाह्य झाले होते. दुर्गा भागवत यांची अत्यंत अभ्यासपूर्ण सविस्तर प्रस्तावना हेही या कथासारित्सागर च्या अनुवादाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. कोणतीही कथा वाचली तरी अत्यंत आनंद मिळतो. अवश्य वाचावे असे हे ५ खंड आहेत.


सोमवार, ९ सप्टेंबर, २०२४

दोन हातावरच्या "समांतर" रेषा .... एकाच आयुष्याची उडाली त्रेधा

 


पुस्तकाचे नाव : समांतर (कादंबरी)

लेखक : सुहास शिरवळकर

माझे पुस्तकाचे रेटिंग :  ⭐⭐⭐⭐⭐ (५ पैकी)

दोन हातावरच्या "समांतर" रेषा .... एकाच आयुष्याची उडाली त्रेधा  
समांतर या कादंबरी वर मागच्या वर्षी मार्च २०२० मध्ये वेब सिरीज चां पहिला भाग MX Player या ॲप आणि वेबसाईट वर रिलिज झाला तेव्हा लोकांना ही वेब सिरीज प्रचंड आवडली होती. कोरोना व्हायरस मुळे निर्माण झालेल्या जागतिक महामारीचे फटके सर्वच क्षेत्राला बसले त्यात मनोरंजन क्षेत्र सुद्धा भरडले गेले. अतिशय आव्हानात्मक परिस्थितीत कलाकारांनी शूटिंग पूर्ण केले आहे आणि बहुतेक पुढील महिन्यात जून २०२१ मध्ये उरलेला अर्धा भाग सीझन २ रिलिज होईल. 

एकूणच याचे प्रमुख श्रेय जाते ते या कादंबरीच्या सशक्त कथानकाला आणि कादंबरीचे लेखक सुहास शिरवळकर यांना. 
प्रत्येकाच्या मनात सुप्तपणे वाटत असते की आपल्यासारखे शापित आयुष्य अजून कोणाचे नसेल. पण समजा असेलच तर ? नेमक्या याच कल्पनेवर आधारित समांतर ही कादंबरी आहे. 
कुमार महाजन परिस्थितीला वैतागलेला. आणि अचानक त्याला समोर नजरेत येतो त्याचा भविष्यकाळ जाणून घेण्याची सुवर्णसंधी. 
कोणीतरी असा मनुष्य आहे त्यांचेच आयुष्य कुमार महाजनला जगायचे आहे. मग शोध सुरू होतो त्या माणसाचा.... सुदर्शन चक्रपाणी चां. 
सुदर्शन चक्रपाणी त्याने स्वतः लिहून ठेवलेल्या डायऱ्या पण कुमार महजनला देतो. 
पण रोज उद्याचेच पान वाचायचे अशी त्याची अट असते. 
पुढे काय होते ? एकदम थरार अनुभवायला तयार असाल तर वाचा समांतर कादंबरी. 




*ब्लॅक किंग* - एक काळया युगाची सुरुवात? -

 


पुस्तकाचे नाव : ब्लॅक किंग (कादंबरी)

लेखक : सुहास शिरवळकर

माझे पुस्तकाचे रेटिंग :  ⭐⭐⭐⭐⭐ (५ पैकी)

*ब्लॅक किंग* - एक काळया युगाची सुरुवात? 

ब्लॅक किंग, माफियांच्या काळया जगातला, एक अनभिषिक्त सम्राट. सुहास शिरवळकर यांच्या बहारदार लेखणीतून त्यांचे नायक जितके वाचकांच्या मनावर कायमचे कोरले जात तसेच त्यांनी रंगवलेले खलनायक देखील वाचकांच्या मनात घर करून राहतात. ब्लॅक किंग हा खलनायक त्यातला शिरोमणी ठरावा.

ब्लॅक किंग या कादंबरीची सुरुवातच मुळी होते एका भयंकर घटनेने. डॅनी, प्रिन्स, इन्स्पेक्टर दिनेश सायगल या त्रिकुटाला मंदार शिवाय अस्तित्व आहे असे वाटत नसे. डॅनी ला चुकून एक फोन येतो. पोलिस स्टेशन ऐवजी त्यालाच तो फोन आलेला असतो. आणि रोंग नंबर टाळून देखील शेवटी विचारतो की काय गडबड आहे? पलीकडची व्यक्ती सांगते की इथे बंदरावर एका व्यक्तीचा खून झालाय आणि पोलिसांना ही माहिती द्यायची आहे. डॅनी विचारतो त्या मृत व्यक्तीची ओळख पटली का? तर पलीकडची व्यक्ती सांगते खिशात मंदार पटवर्धन हे विझिटींग कार्ड सापडले आहे आणि जवळच एक फेयर डील कार उभी आहे.
डॅनी फोन बंद करून एकदम खाली बसतो आणि हमसून रडायला लागतो. मंदरच्या खुनाची बातमी सर्वात पहिली त्यालाच आणि तेही एका रॉंग नंबर मुळे कळावी यासारखे दुसरे दुर्दैव नव्हते.
आपला नायक कादंबरीच्या सुरुवातीलाच मेलेला आहे. आणि डॅनी हताशपणे बसलेला आहे. इतर लोक त्यावेळी काय करत होते ? या बेसावध क्षणी डॅनी बेभान होऊन सूड घेण्यासाठी निघणार असतो. शिल्पा त्याला सावध करते. ट्रॅप तर नाही ना हा ? अशी शंका येताच मंदारच्या घरी फोन लावून खात्री करून घ्यायला लावते. पुढे क्लू मिळतात आणि मंदार खरोखर डॉकयार्ड वर गेलेला असतो आणि खून होण्याच्या काही वेळ आधीच तेथून निघालेला असतो.
म्हणजे मंदार खरेच मेलाय तर. डॅनी अतिशय त्वेषाने तयार होतो. २४ सुरे अंगावर बाळगून तो निघाला होता.

शिल्पा अजूनही संयमाने हे प्रकरण
घेत होती. ती प्रिन्स आणि दिनेश सायगल ला फोन लावणारच होती.
डॅनी ची पाँटेक हवेशी स्पर्धा करत पळत होती. डॅनी चे डोके सुन्न झाले होते.
मंदारला कोणी मारले असेल ? माहिती नाही
मंदार च्याच प्रेता जवळ त्याची डेमलर कार कशी सापडली?
माहिती नाही.
कोण दुश्मन आहे ज्याची ताकद एवढी मोठी आहे की मंदारला मारू शकेल ?
माहिती नाही.
अशा कित्येक अनुत्तरित प्रश्नांनी डॅनी एकमेव क्लू जिथे मंदार चे प्रेत आहे तिथे प्रेफरन्स शिपिंग कंपनी च्याच कार्यालयात घुसतो.
डॅनी पोहोचतो तेव्हा अंधार असतो. पूर्ण तयारीत डॅनी घुसतो.
पुढे काय होते ?
माहिती नाही 😁😁 😜
यापुढील कथानक सांगून लज्जत घालवत नाही.

पण ब्लॅक किंग उर्फ हरीश चंदानी ने मागील एका प्रकरणात (गोल्ड हेवन बहुतेक) मंदारला सांगितलेले असते की तो परत येईल आणि तेव्हा तो कोणालाही संधी देणार नाही. ब्लॅक किंग चे हस्तक एल्पार, पहाड, सायली परत येतात हे  नक्की. पण ते कसे येतात ? डॅनी सोबत बँकिम चक्रवर्ती, त्यांची मुलगी आणि मंदारची प्रेयसी रश्मी , प्रिन्स आणि दिनेश या गँगचा खात्मा ब्लॅक किंग स्वतःच्या पद्धतीने कसा करण्याचा बेत आखतो आणि तो तडीस जातो की नाही? मंदार चे प्रेत सर्वांना दिसते काय ? नायक मेलाय अशा विपरीत स्थितीत मंदार ची गँग ब्लॅक किंग शी लढू तरी शकत होती का?
पुढे काय होते ते मुळातच वाचण्यासारखे आहे.
ब्लॅक किंग च्या काळया युगाची सुरुवात होते की नाही?
मंदार ला बेसावध ठेवून ब्लॅक किंग कार्यभाग साधतो कसा?
डॅनी , प्रिन्स आणि दिनेश यांचे पुढे काय होते?
अशा प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी वाचाच *ब्लॅक किंग* 😍😍

****************************


पडद्याआड - सुहास शिरवळकर यांची एक गुंतागुंतीची रहस्यकथा

 



पुस्तकाचे नाव , त्याचे मुखपृष्ठ आणि कादंबरी यांचा परस्पर संबंध अतिशय समर्पकपणे आढळून येणाऱ्या मोजक्या लेखकांत सुहास शिरवळकर यांच्या समावेश होतो.
पडद्याआड चेच बघा ना. पडद्याआड लपलेल्या व्यक्तीचे फक्त बुट घातलेले पाय दिसतात. पूर्ण कादंबरी वाचून झाल्यावरच हे मुखपृष्ठ किती समर्पक आहे हे वाचकांना अवश्य जाणवते. कारण संपूर्ण कादंबरी याच घटनेच्या अवती भवती फिरत राहते.
आता बघुयात पडद्याआड नेमके काय काय दडले आहे ज्यामुळे वाचकांना ही कादंबरी वाचायचा अनिवार मोह झालाच पाहिजे
कादंबरी सुहास शिरवळकर यांचा मानसपुत्र अमर विश्वास याची असल्यामुळे कोर्ततले सीन आणि वेगवान शोध मोहीम या कादंबरीच्या गाभ्यात असणार हे उघड आहे. पण पडद्याआड ही सर्वार्थाने इतर अमर कथांपेक्षा जरा वेगळी ठरते. पाहुयात काय आहे या पडद्याआड.
जिमी आणि रणजित दोघा अट्टल बदमाशांची जुगारात केलेल्या हातचलाखी मुळे मारामारी होते त्यात रणजित जिमी आणि त्याच्या चेल्यांची जबरदस्त धुलाई करतो. लोळा गोळा होऊन पडलेल्या जिमी समोरून पैसे घेऊन रणजित बेफिकीर पणें निघून जातो. तेव्हाच जिमी ठरवतो की रणजित चां काटा काढायचा.
कोण असतो रणजित?
भैय्या सारंग याची कलकत्त्यात गॅंग असते. आणि त्याचा रणजित महत्त्वाचा माणूस असतो. काहीतरी गडबड करून रणजित भैय्या सारंग चां एक स्मगलिंग चां लॉट घेऊन मुंबईला पळून येतो. मुळातच अट्टल बदमाश असलेला रणजित मजेत आणि बेफिकीर आयुष्य जगत असतो. जिमी शी झालेला प्रसंग रणजित विसरलेला असतो. अशा कितीतरी जिमींना त्याने आगोदर संपवलेले असते त्यामुळे असल्या चिल्लर गुंडांना रणजित घाबरण्याचे कारणही नसते.
अचानक एकदा त्याच्या कारचा पाठलाग होतो. एकूण पाच जण असतात. सहज त्याला जिमी आठवतो. स्वतःच्या अपार्टमेंट मध्ये जाऊन रणजित वाट बघत असतो. पाचही जण गुपचूप फ्लॅट मध्ये येतात. बेडरूम मध्ये रणजित पहुडलेला बघून अंधारात सगळे आपापले सुरे घेऊन त्याला सर्वत्र भोसकतात. आणि काम झाल्याची  खात्री पटताच निघून जातात. लपलेला रणजित बाहेर येऊन स्वतःशी बोलू लागतो. पुन्हा एकदा त्याच्या रबरी बाहुली ने त्याला वाचलेले असते. आता रणजित निर्धास्त होतो आणि बेडवर आडवा होऊन झोपून जातो. बऱ्याच वेळाने पडद्याआड एक हालचाल होते. पडद्याआड लपलेली व्यक्ती बाहेर येते आणि रणजित च्याच उशाखालचे साइलेंसेर लावलेले रिव्हॉल्व्हर पकडून तीन शॉट्स रणजित च्याच डोक्यात झाडते.
आत्महत्या दाखवण्यासाठी ट्रिगर वरती रणजित चां हात ठेवून देते. इतक्यात दार वाजते. खुनी माणूस दार उघडतो तर दारात सॉलोमन (रणजित चां शेजारी) असतो. खून करण्या ऐवजी त्याचा चेहरा पाहिल्यामुळे खुनी सॉलोमन ची जीभ कापतो आणि डोळे काढून ठेवतो. आता खून्याचे वर्णन सॉलोमन करू शकणार नसतो.
अशी एकूण सुरुवात होते. मध्येच अनेक पात्रे उगवतात... रणजित ची प्रेयसी फरियास ... तिचे मादक सौदर्य... ती जिमीच्या बार मध्ये कॅब्रे डान्सर का असते ? जिमी आणि रणजित ची लढाई पूर्वनियोजित असते का ? रणजित चां बॉस भैय्या सारंग त्याच्या मागावर असतो का ? त्याचा स्मग्लींग चा माल रणजित कडे सापडतो का ? सोनेरी पेंटिंग्ज चे रहस्य काय असते ? रणजीत च्याच बिल्डिंग मध्ये राहणारी अरळकट्टी कोण असते ? तिच्याकडे येणार्यांकडे वॉचमन दुर्लक्ष का करत असतो ?
रणजित च्या खुनाचे कोडे सुटते का?
बॅरिस्टर अमर, गोल्डी, इन्स्पेक्टर ब्रिजेश लाल यांना खुनाचा गुंता सोडवता येतो का ? इन्स्पेक्टर ब्रिजेश लाल याला अचानक सस्पेंड का केले जाते ? आपल्या मित्राला वाचवण्यासाठी अमर यशस्वी होतो का? रातोंका राजा अवतरतो तेव्हा कोणालाही न सुटलेलं कोडं तो सोडवू शकतो का ? उस्मान चाचा ची झोपडी या संपूर्ण केस मध्ये महत्त्वाची का ठरते ? असल्या मेंदूला झिणझिण्या आणणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरे पडद्याआड वाचून सुशिंच्या वाचक प्रेमींना मिळतील.
पडद्याआड चे वैशिष्ट्य हे आहे की रातों का राजा , गोल्डी , इन्स्पेक्टर लाल, मोहिनी आणि मास्टर ब्रेन बॅरिस्टर अमर विश्वास यांच्या मेंदूची कसोटी लागते. मिस  फरीयास अमरला गुंडळते का ? की अमर एका भयानक चक्रव्यूहात अडकतो ? त्यातून तो सुटतो की नाही ? भैय्या सारंग हे महत्त्वाचे पात्र असून या पात्राचे हादरवून टाकणारे सत्य काय असते ? अशा जबरदस्त वातावरण निर्मिती करणारी आणि वाचायला हवीच अशी कादंबरी म्हणजे पडद्याआड.

गॉडफादर - मेंदूला झिणझिण्या आणणारी व पूर्ण वाचनानंद देणारी कादंबरी

 





गॉडफादर या जगविख्यात कादंबरीचा अनुवाद मराठीत रविंद्र गुर्जर यांनी केलाय.
तर गॉडफादरची कहाणी सुरु होते ती आजच्या जगात (म्हणजे कादंबरी लिहिली तेव्हाच्या काळात) डॉन ला तीन मुले असतात. त्यापैकी संतिनो हा शीघ्र कोपी आणि प्रचंड रागीट, त्यामुळे त्याच्या वाटेला क्वचितच कोणी जायचे. दुसरा फ्रेडी स्त्रीलंपट असल्याने फॅमिलीच्या बिझिनेसमध्ये उपयोग शुन्य. तिसरा मायकेल मात्र बापाशी फारकत घेऊन त्याच्या इच्छेच्या विरोधात अमेरिकन सैन्यात असतो. सगळे  गुन्हेगारी विश्व सुरळीतपणे सुरु असते.  पण त्या काळात अमेरिकेत प्रचंड मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थाचा व्यापार करण्यासाठी इटलीहून सोलोझो येतो. या सोलोझोला डॉनचे शत्रू असलेल्या पाच प्रमुख फॅमिलींचे पाठबळ असते. असे असूनही हा धंदा अमेरिकेत पसरवण्यासाठी सोलोझोला डॉन कॉर्लिऑनची मदत हवी असते. याचे मुख्य कारण असते ते डॉनच्या पोलिस, न्यायपालिका व राजकारणी नेते यांच्याशी असलेले जवळचे संबंध. पण  नशेच्या पदार्थांच्या विरोधात असलेल्या डॉनला सोलोझोचा प्रस्ताव मान्य होत नाही. या मिटिंगच्या वेळी संतिनो उर्फ सोनी कॉर्लिऑन चर्चेत मध्येच बोलतो आणि सोलोझोला कळते की संतिनो आपल्या उपयोगी पडू शकतो. अशा  तंग वातावरणात मिटिंग संपते आणि डॉन संतिनोला खडसावतो की ही चूक खूप महागात पडेल. पुढे घडतेही तसेच. डॉन कॉर्लिऑनवर खुनी हल्ला होतो आणि एका वेगवान कथानकाच्या गर्तेत वाचक गुरफटत जातो. कथानकाच्या अनुषंगाने पुढे अनेक पात्रे त्यात आहेत. हेगन वकील, खर्टुम या घोड्याचा मालक व चित्रपट निर्माता जॅक, त्याचा चित्रपट मिळवण्याच्या प्रयत्नात असलेला गॉडफादर डॉन चा मानसपुत्र, अनेक अंगातून खुलत जाणारी ही कादंबरी खूप रोमांचकारी आहे.

व्हिटो असलेला कॉर्लिऑन हा डॉन कॉर्लिऑन कसा होतो त्याच्यावर खुनी हल्ला का होतो? अमेरिकन नेव्हीमध्ये असलेला त्याचा मुलगा मायकेल त्याची मैत्रीण के अ‍ॅडम्स बरोबर असताना वडिलांवर गोळ्या झाडल्याची बातमी वृत्तपत्रात वाचून पुढे काय करतो? संतिनो वडिलांवर झालेल्या हल्ल्यावर प्रतिहल्ला करतो का? त्यात तो यशस्वी होतो का? कॉर्लिऑन फॅमिलीला पुढे पाचही शत्रू फॅमिलीशी वैर घ्यावे लागते का? टोळी युद्ध होते का? त्यात ते टिकतात का? शेवटी कॉर्लिऑन फॅमिलीला काय किंमत मोजावी लागते? डॉनचे पुढे काय होते? डॉनचे डावे व उजवे हात क्लेमेंझा व टेशियो यांची  या सर्व गदारोळात काय भूमिका असते?  अशा अनेक प्रश्नांची उकल कादंबरीत टप्प्याटप्प्याने होत जाते पण प्रत्येक उत्तराबरोबर वाचकाला हादरे बसतात. अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकाच्या परिचयात सांगून पुस्तकाची रंगत घालवत नाही. पण माफियाचे काम कसे चालते आणि स्वतःचे अस्तित्त्व आणि वर्चस्व टिकवण्यासाठी माफिया टोळींतील युद्ध कोणत्या थराला जाते हे वाचणे  खरोखर भयानक आहे. पण रक्ताने रंगल्याशिवाय माफियाचे कामही होत नाही. अतिशय गुंतागुंतीच्या पण अतिशय ताकदीच्या या कादंबरीच्या  वाचनामुळे वाचक थरारुन जातोच. पण मेंदूला झिणझिण्या आणणारी  व पूर्ण वाचनानंद देणारी कादंबरी  म्हणजे गॉडफादर...

गॉडफादर या कादंबरीवर ३ भागांत इंग्रजी भाषेत चित्रपटही तयार झालेला आहे. आणि तो देखील तितकाच गाजलेला आहे. भारतातही हिदी चित्रपटसृष्टीला गॉडफादरचा मोह आवरलेला नाहिये. फिरोज खानचा "धर्मात्मा" आमीर खान चा आतंक ही आतंक हे मूळ चित्रपटाचे थेट रिमेक होते. गॉडफादर मधील अनेक प्रसंगांच्या कल्पना अनेक चित्रपटांतून  वापरल्या गेल्या. तरी मूळ इंग्रजी चित्रपटाच्या ताकदीचा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीला तयार करता नाही आला.
तरीही वाचकांसाठी गॉडफादर हे पुस्तक मोठी मेजवानी आहे. एक अतिशय वेगवान , थरारक आणि श्वास रोखुन धरायला लावणारी अशी ही गॉडफादर कादंबरी पानापानातून वाचकाला थरार अनुभवायला देते.  आवर्जून वाचण्यासारख्या अनुवादित पुस्तकांपैकी गॉडफादर हे खूप वरचे पुस्तक मी मानतो. 

जी,ए.कुलकर्णी यांच्या "रमलखुणा" च्या अर्पणपत्रिकेचे मर्म

 

जी,ए.कुलकर्णी यांच्या "रमलखुणा" च्या अर्पणपत्रिकेचे मर्म

जी.ए.कुलकर्णी  यांच्या "रमलखुणा" या अवघ्या दोनच पण दीर्घकथा असलेल्या सुंदर पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेतच जी.एं.ची गुंफण सुरु होते.
अवघ्या एका ओळीची अर्पणपत्रिका पण मनांत उत्सुकता निर्माण करणारी. 


   "बेळगांव नावाच्या गावास....पावले जरी दूर भटकत गेली तरी तुझ्या जुन्या आठवणींची बुत्ती सतत जवळ राहिली आहे..." 



रमलखुणाच्या अर्पण पत्रिकेत आलेल्या बेळगांव या गावाबद्दलच्या ओळीमुळे जी.एं.बद्दल आलेल्या थोड्या गोष्टी येथे सांगणे अवश्य वाटते. कारण त्याशिवाय रमलखुणाच्या अर्पणपत्रिकेची उकल होणार नाही. 
बेळगांव येथील जी.एं.चे वास्तव्य हे क्लेशदायक होते. त्यामुळे जी.ए. पुढे धारवाडला स्थायिक झाले. बेळगांव मधील अनुभवांतून बेळगांवबद्दल जी.एं.च्या मनात एक अढी बसली. इतकी की त्यामुळे मधे एका कोर्टाच्या कामासाठी बेळगांवला जावे लागले असता त्यांनी गावात पाऊलही टाकले नाही. जी.एं.ची पुढील वाक्ये त्यांच्या या वेदनेचा प्रत्यय देतील. जसे,
"काही घरांनाच शापित चेहरा असतो की काय कुणास ठाऊक?"


"आपणाला मिळालेले आयुष्य पुन्हा जसेच्या तसेच जगण्याची तयारी असलेली माणसे भाग्यवानच म्हटली पाहीजेत. मी त्या भाग्यवंतांपैकी नाही"



"एखाद्या फरारी गुन्हेगाराला पकडण्यासाठी शिपाई टपून असावेत, त्याप्रमाणे तेथे जुन्या आठवणी टपून आहेत. खरे सांगायचे म्हणजे त्या आठवणींची जन्मठेप झालेलाच मी एक माणूस आहे" 

 

विजया राजाध्यक्ष यांना लिहिलेल्या एका पत्रात जी.एं.नी त्यांच्या या वेदना मांडलेल्या आहेत. 'जी.एं.ची निवडक पत्रे - खंड -४ मध्ये त्या सविस्तरपणे वाचायला मिळतील'.
याच पत्रात जी.एं.नी रमलखुणाच्या अर्पणपत्रिकेचे मर्मही सांगितले आहे. 

 
"मी माझे एक पुस्तक बेळगावला अर्पण केले आहे. त्यात माझा स्वतःचा एक अर्थ म्हणजे ते केवळ अर्पण नसून तर्पण आहे, असा आहे" 


जी.एं.च्या गारुडाचा हा प्रवास चालूच राहणार आहे. 
या अर्पण पत्रिकेवर लेखनाचा योग आला तो आमचे अशोक पाटील काका यांच्यामुळे. जी.ए.कुलकर्णींवर अधिकारवाणीने फेसबुकवर त्यांनी एक भरगच्च लेख लिहिला व त्यामुळे मी हे तोडलेले थोडेफार तारे. एवढेच. बाकी रमलखुणाची सगळी जादू जी.एं.ची

हिरण्यदुर्ग : एक अत्यंत थरारक व रोमांचकारी संघर्षाचा प्रवास



८ फेब्रुवारी २०१५ च्या रविवार "महाराष्ट्र टाईम्स" च्या 'संवाद' पुरवणीत मी लिहिलेले हिरण्यदुर्ग या संजय सोनवणी लिखित पुस्तकाचे परिक्षण
जागेच्या अभावी सुरुवातीचा काही भाग छापून आलेल्या लेखात नाहिये. वाचकांसाठी मूळ लेख जसाच्या तसा देत आहे
https://marathi.indiatimes.com/editorial/samwad/book-review/articleshow/46157310.cms 

हिरण्यदुर्ग  - एक रोमांचकारी संघर्षाचा प्रवास

अद्भुतरम्य कादंबरी हा साहित्यप्रकार तसा मराठी साहित्याला नवा नाहीये. पण दुर्दैवाने मराठी साहित्यात या कादंबरी प्रकारात फारसे काम लेखकांकडून झालेले नाही. मुळात कथानक गुंफण्याचं विलक्षण कसब असणारा लेखकच या अद्भुताच्या विश्वात प्रवेश करायला धजावतो. हा साहित्यप्रकार मराठीत सुरु कसा झाला हा एक खरोखर एक उत्सुकतेचा विषय आहे.

मराठीत अद्भुतरम्य कादंबर्‍यांची सुरुवात गो.ना.दातार, ना.ह आपटे अशा लेखकांपासून सुरु झालेली असली तरी या लेखकांनी प्रामुख्याने रेनॉल्ड्स च्या इंग्रजी कादंबर्‍यांना मराठी वातावरणात बसवून सुरुवात केली. म्हणजे वस्त्र मराठी असले तरी आतला आत्मा विदेशीच होता. असे असूनही या सर्व लेखकांचे महत्त्व अजिबात कमी होत नाही. गो.ना. दातार यांनी रेनॉल्ड्स या पाश्चात्य लेखकाच्या कादंबर्‍यांची भारतीय रुपांतरे मोठ्या प्रमाणावर केल्यामुळे व त्या कादंबर्‍या लोकप्रिय झाल्यावर अद्भुतरम्य कादंबर्‍या अनेक मराठी लेखक लिहू लागले. पण त्या सर्व कादंबर्‍यांचे सांगाडे विदेशी लेखकांचे असत. पण मराठीत या साहित्यप्रकाराचा जणू दुष्काळच पडला. अधे-मधे अनेक प्रयत्नही झाले. पण शशी भागवतांखेरीज अन्य लेखकाचे नाव स्मरणात रहावे असे काम झाले नाही. काही दशकांपूर्वी 'मर्मभेद'कार म्हणून गौरविले गेलेल्या शशी भागवतांच्या या कादंबरीतले अद्भुत ऐयार त्यांच्याही आधी दोन दशकांपूर्वीच देवकीनंदन खत्रींच्या 'चंद्रकांता' या हिंदी कादंबरीत आले होते. 'चंद्रकांता'त ऐयार कुठून आले हा संशोधनाचा विषय होऊ शकेल. पण बाळसे धरु लागलेला अद्भुतरम्य कादंबरी हा साहित्य प्रकार आता संपुष्टात येतो की काय असे चित्र असतानाच आणि २०१४ वर्ष संपत असताना लेखक संजय सोनवणी यांची हिरण्यदुर्ग ही कादंबरी प्रकाशित झाली. हिरण्यदुर्ग मुळे अद्भुतरम्य कादंबरी या साहित्य प्रकाराचे नुसते पुनरुज्जीवनच झाले असे नव्हे तर या साहित्यप्रकाराला मराठी भाषेत संपूर्णपणे देशी बनावटीचे रुप बहाल केले. विदेशी सांगाडा आणि आत्मा पूर्णपणे फेकून देऊन लेखक संजय सोनवणी यांनी हिरण्यदुर्गची निर्मिती केली. यामुळेच ही कादंबरी मराठी साहित्यातील एक मानदंड ठरणारी कादंबरी आहे. गेल्या कित्येक दशकांत प्रकाशित झालेल्या ढीगभर पुस्तकांत "हिरण्यदुर्ग" खरोखर सोन्याच्या तेजस्वितेने तळपणारे पुस्तक आहे.





या पार्श्वभूमीवर संजय सोनवणी लिखित 'हिरण्यदुर्ग' ही अद्भुतरम्य कादंबरी आहेच, पण त्या प्रकारात मानदंड ठरावी, अशी आहे. कारण आतापर्यंतच्या अद्भुतरम्य कादंब‍ऱ्या भारतीय रुपातल्या असल्या, तरी बहुतेकांचे कथासूत्र बव्हंशी विदेशी व क्वचित इतर भाषांतील कादंब‍ऱ्यांवरुन घेतलेले होते. म्हणूनच कथानकाचा सांगाडा व जडणघडण संपूर्णपणे मराठी असलेली 'हिरण्यदुर्ग' ही मराठीतील पहिली अद्भुतरम्य कादंबरी म्हणायली हवी.
सातवाहनांचा गौरवशाली काळ हा खरेतर महाराष्ट्राच्या व आपल्या देशाच्या इतिहासाचाही मानदंड असायला हवा होता. पण यावर दुर्दैवाने आपल्या संशोधक वा इतिहासकारांकडून म्हणावी तशी भरीव कामगिरी झाली नाही. स्वतः लेखक संजय सोनवणी हे इतिहास संशोधकही असल्याने सातवाहनांच्या काळाची पार्श्वभूमी 'हिरण्यदुर्ग' या कादंबरीसाठी वापरुन त्यांनी एक प्रकारे वाचकांसाठी महाराष्ट्राच्या सातवाहन राजांच्या वैभवशाली इतिहासाची कवाडेच जणू उघडून दिली आहेत.

'हिरण्यदुर्ग' या कादंबरीत असे काय आहे की ज्यासाठी वाचक पुस्तकाला चिकटून राहतो? अद्भुत, वीर, रौद्र, बीभत्स, भय, रोमांच, थरार, शौर्य, प्रेम, वासना, थरकाप, हिडिस, घृणा, प्रेरणा, चेतना, आशा, निराशा, जय, पराजय, सुष्ट, दुष्ट, हिंसा, अहिंसा, संहार, प्रतिकार, अशा कित्येक प्रकारच्या मनोभावनांचा परिचय वाचकांना 'हिरण्यदुर्ग' ही अद्भुतरम्य कादंबरी करुन देते. कादंबरीचे नाव 'हिरण्यदुर्ग' असल्यामुळे हिरण्यदुर्ग या कादंबरीत केंद्रस्थानी असणार हे उघड आहे. तरीही कादंबरीची सुरुवात होते, ती सिंहभद्र आणि केतुमाल या दोन आगंतुक प्रवाशांबरोबर. हे दोन्ही प्रवासी वाट चुकून सूर्य मावळल्यानंतर हिरण्यदुर्गाच्या परिसरात येतात आणि त्यांचे खूप आदरपूर्वक स्वागत होते. प्रवासाने थकलेले हे दोघे प्रवासी हिरण्यदुर्गाची श्रीमंती पाहत सुग्रास भोजन करुन मदनमंजि‍ऱ्यांच्या गोड सहवासात रात्री गाढ झोपी जातात. सकाळी दोघे जागे होतात आणि पूर्णपणे हादरतात ते उध्वस्त भिंती... गच्च झुडपांचे रान... ढासळलेले बुरुज ...असा दुर्ग पाहून. काय असते हिरण्यदुर्गाचे हे भयंकर रहस्य? पुढे हिरण्यदुर्गाच्या कक्षेतून बाहेर पडून सिंहभद्र आणि केतुमाल हे प्रवास करु लागतात. वाटेत एक गूढ जटाधारी भेटून त्यांना आसरा देतो. त्याच्या साहाय्याने एका गुप्त गुहेच्या मार्गाने दुस‍ऱ्या बाजूने ते दोघे बाहेर येतात. या दरम्यान धनगरांकडून मिळालेली धक्कादायक वागणूक वाचकांना आश्चर्याच्या गर्तेत ढकलते. खुद्द सिंहभद्रदेखील त्या वागणुकीने चक्रावतो. जसजसा त्या निष्पाप व मोकळ्या मनाच्या धनगरांच्या सहवासात राहून सिंहभद्र गोष्टी ऐकत जातो तसतसा त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. स्वतःच्या आजच्या अस्तित्वाची पाळेमुळे शेकडो वर्षांपूर्वीच्या भयंकर संग्रामात दडलेली आहेत, हे जाणून स्वतः सिंहभद्र आणि पर्यायाने केतुमाल दोघांचाही थरकाप उडतो.

पुढे कादंबरीतील खलपुरुष पुलोम्याच्या सर्व शक्ती जागृत होतात आणि तो प्रकटतो. पुलोमा अवतीर्ण झालाय आणि सिंहभद्र अजूनही स्वतःच्या अस्तित्वाची पाळेमुळे शोधतो आहे. अशा विपरीत अवस्थेत भयंकर रणसंग्रामाला सुरुवात होते. असंख्य लोहपीसांचा वर्षाव करणारा लोहपक्षी, त्याच्याशी लढणारा सिंहभद्राच्या आज्ञेतील त्रिशूळ. सिंहभद्राच्या शक्ती जागृत होण्याअगोदरच त्याला नष्ट करण्याच्या हेतूने अवाढव्य पर्वतच्या पर्वत उध्वस्त करणारा पुलोमा. पाताळगंगेचे रहस्य, विनाशकारी परिस्थितीत तेर नगरीतील सर्पांच्या राजाकडे सुरक्षित ठेवलेले गूढ आणि रहस्यमयी बाड. ते बाड मिळून सिंहभद्राच्या शक्ती जागृत होण्याअगोदरच पुलोम्याने नागांच्या राणीला आपल्या सापळ्यात अडकवून बाड नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न. बाडाच्या रक्षणासाठी झटणा‍ऱ्या शक्तीश्री महाराजांना आलेले अपयश. अशातच गोंधळलेल्या सिंहभद्राच्या आयुष्यात देवसेनेचा अचानक झालेला प्रवेश. पुलोम्याला देवसेनेचा पडलेला मोह. अशा अनेक धक्क्यांमागून धक्के देणारे हे अद्भुतरम्य कथानक वाचकाची उत्कंठा शेवटच्या पानापर्यंत ताणून धरण्यात यशस्वी ठरते.

सिंहभद्र कोण असतो? देवसेना कोण असते? पुलोमा कसा अवतरतो? सिंहभद्राला जागे करु शकणारे बाड नष्ट होते का? त्यात काय असते? लोहपक्ष्याशी त्रिशूळ कसा लढतो? त्रिशूळ सिंहभद्राच्याच आज्ञेत का असतो? हिरण्यदुर्गाचे रहस्य काय असते? हिरण्यदुर्गाच्या पोटात असे काय रहस्य दडले असते की सर्वशक्तिमान पुलोमाही त्यात प्रवेश करु शकत नसतो? सिंहभद्राला त्याच्या शक्तींचे भान येते का? युद्धात कोण जिंकतो? पुलोमा की सिंहभद्र? तेर नगरीतील सर्प सातवाहनांच्या चरणी वाहिलेली आपली जन्मोजन्मीची निष्ठा पाळतात का? पाताळगंगेचे रहस्य काय असते? सातवाहनांच्या राजांची सिंहभद्र आणि पुलोमाच्या संघर्षात काय भूमिका असते? सातवाहन ते बाड एवढे का जपत असतात? शक्तिश्री राजाची कन्या देवसेनेचे एक रहस्य काय असते? कुबड्या कोण असतो? त्याचे रहस्यमय वागणे शेवटी कसे उकलते? कोण असतो हिरण्यदुर्गाचा खरा स्वामी? धर्मपाल आणि महाधम्मरक्ख (बौद्ध भिक्खू) सिंहभद्राला कोणती मदत करतात? शक्तीश्रीमहाराजांचे एकनिष्ठ सेवक आमोदक आणि गंगाधर बाडासाठी शेवटपर्यंत कसे झुंझतात? हिरण्यदुर्गाच्या परिसराचे रहस्य उकलते का? मरुगण नेमके कोण असतात? ते कोठून आलेले असतात? त्यांचा सिंहभद्राशी काय संबंध असतो? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे पानोपानी उत्कंठा ताणून धरणा‍ऱ्या 'हिरण्यदुर्ग' या अद्भुतरम्य कादंबरीत मिळतात.
अद्भुतरम्य कादंबरी मध्ये धक्कातंत्र प्रभावीपणे वापरणे, हे अतिशय कौशल्याचे काम असते आणि त्यात 'हिरण्यदुर्ग' कादंबरीचे लेखक संजय सोनवणी यशस्वी झालेले आहेत. ही कादंबरी वाचताना वाचकाला पानोपानी धक्के बसतात. जेव्हा वाचक भानावर येतो तेव्हा लक्षात येते की आपली कादंबरी वाचून पूर्ण झालेली आहे. हेच 'हिरण्यदुर्ग'चे अद्भुत यश आहे. वाचकाला अजून काय हवे असते? 'हिरण्यदुर्ग' वाचून पूर्ण झाल्यावर वाचकाच्या मनात उरतो तो एका थरारक व रोमांचकारी प्रवासाचा आनंद. .........

पुस्तकाचे नाव : हिरण्यदुर्ग.
साहित्य प्रकार : अद्भुतरम्य कादंबरी.
लेखक : संजय सोनवणी.
मुखपृष्ठ : राजेंद्र गिरधारी.
प्रकाशक : प्राजक्त प्रकाशन, पुणे.
पृष्ठं : ३५२
किंमत : ३५० रु.

शपथ वायुपुत्रांची - वाचनानंद देणारा थरार

 




पुस्तकाचे नाव : शपथ वायुपुत्रांची
मूळ लेखक : अमिश त्रिपाठी
मराठी अनुवादः मेघना संभू-शेट्ये
पृष्ठसंख्या : ६८४
किंमत : रुपये ३९५
(पण ऑनलाईन मागवल्यास सवलतीत २१० ते २३० पर्यंत  मिळून जाते)


शपथ वायुपुत्रांची कालच वाचून झाले. मला तरी शिवा ट्रिलॉजी आवडली. मूळ कथानक केंद्र स्थानी ठेवून मी वाचत असल्यामुळे आणि तांत्रिक, भाषिक, मुद्रण, अनुवाद अशा चुकांकडे दुर्लक्ष करु शकल्यामुळे कथानकाचा खूप मस्तपणे आनंद घेता आला. वायुपुत्रांची शपथ या तिसर्‍या आणि शेवटच्या भागाचा आत्मा दोन प्रमुख गोष्टींत आहे
१. कथानकाची लयबद्धता आणि
२. सती
 या व्यतिरिक्त शिव, गणेश, कार्तिकेय, भगीरथ, भृगू, पाशुपतास्त्राची प्राप्ती, अज्ञात मारेकरी, मेलुहाचा सेनापति इत्यादी प्रमुख गोष्टी आहेतच. तरीही कथानकाचा आत्मा व्यापला आहे तो याच २ गोष्टींनी 

सती चे पात्र प्रचंड ताकदीने या भागांत रंगवले गेले आहे. तसे ते सुरुवातीपासूनच होते. पण तिसर्‍या भागाच्या वाचनानंतर मनात काही उरत असेल तर ते शिव नसून सती. हे पात्र खूप ताकदीने रंगवले गेले आहे पण त्यामुळे शिवा ट्रिलॉजीच्या शेवटी शिव कमी उरतो.
माझ्यामते 'शपथ वायुपुत्रांची' च्या उणीवा व बलस्थाने अशी आहेत :
बलस्थाने:
१. सती
२. कार्तिकेयाने केलेला शत्रुचा संहार छान रंगवलेला आहे
३. तोच संहारक कार्तिकेय नंतर संयमी दाखवला आहे
४. कथानकाची सुसुत्रता आणि लयबद्धता
५. शिवाचे प्रभावी निर्णय आणि व्यक्तीमत्त्व
६. सतीचा निष्णात मारेकर्‍यांशी झालेला लढा. हे प्रकरण विशेष प्रभावित करते.
उणीवा:
१. शपथ वायुपुत्रांची हे शीर्षक असलेल्या भागात वायुपुत्रांचा प्रभावच जाणवत नाही.
२. पाशुपत्य अस्त्राची न समजणारी माहिती देऊन उगाच गोंधळ वाढवला आहे
३. शिव हा शीघ्रकोपी आणि संहारक अशी त्याची पुराणांतली प्रतिमा आहे असे असताना मेलुहाची राजधानी देवगिरी व त्यातील सर्व सैनिकांचा व मेलुहावासीयांचा संहार अतिशय संथपणे वेळ देऊन केलेला दाखवला आहे. बर हे फिक्शन आहे हे माहिती असूनही पुढे त्यानंतरच्या प्रकरणांत पुराणांतील कथांशी नाळ जोडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तो तोकडा पडला आहे. असा शेवट उरकण्यापेक्षा कथानक स्वरुपातच शेवट दाखवला असता तर अधिक प्रभावी ठरला असता.
पहिल्या पुस्तकापासून शेवटच्या भागापर्यंत लेखकाने कथानकातील लयबद्धता टिकवली असल्याने आणि धक्का तंत्राचा बर्‍यापैकी यशस्वी वापर केला असल्यामुळे ही मालिका वाचनीय आहे हे नक्की.

सध्या व्यस्ततेमुळे थोडक्यात लिहिले आहे. पुढेमागे पूर्ण तिन्ही भागांवर (शिवा ट्रिलॉजीवर ) सविस्तर एक लेख लिहीन.

धन्यवाद

मेलुहाचे मृत्युंजय - शिवाची थरारक कहाणी


'मेलुहाचे मृत्युंजय'  हा 'द इम्मॉर्टल्स ऑफ मेलुहा' या अमिश त्रिपाठी यांच्या मूळ इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद काल रात्रीच वाचून झाला. डॉ. मीना संभू-शेटे यांनी मराठी अनुवाद कसदार केला आहे. 
पुस्तकातील तांत्रिक चुकांकडे दुर्लक्ष करुन आणि एक फिक्शन (कल्पनाविलास) म्हणून वाचले तर हे पुस्तक चित्तवेधक आहे. खिळवून ठेवण्याची क्षमता या कादंबरीत नक्कीच आहे. तसेच ही कादंबरी वाचकाला पुढील भाग वाचण्यास उद्युक्तही करते. आता पुढील मराठी भाग कधी प्रकाशित होतोय याकडे लक्ष आहे.
कादंबरीत शिवाचे पात्र अतिशय सक्षमपणे रंगवलेले आहे. महादेव, रुद्र या विभिन्न व्यक्तीरेखांनंतर शिव हा महादेवाची जबाबदारी स्वीकारणारा श्रीरामानंतरच्या काळातला नायक आहे. महादेवाची जबाबदारी तो पेलू शकेल की नाही याबद्दल शिवाच्या मनातील आंदोलने अतिशय ताकदीने कादंबरीत उतरवलेली आहेत. मेलुहाच्या लोकांची जीवनपद्धती देखील वाचकाला प्रभावित करते. सतिचे पात्र अतिशय प्रभाव टाकते. तसेच कनखला, पार्वतेश्वर व आयुर्वती ही देखील या कादंबरीची लक्षात राहणारी ठळक पात्रे. दक्षाची भूमिका पटत नसली तरी त्याची व्यक्तीरेखा फारसा प्रभाव सोडत नाही. मेलुहाचे लोक सूर्यवंशी व प्रभू श्रीरामाच्या आदर्श नियमांना काटेकोर पणे मानणारे असतात व त्यांचे चंद्रवंशी लोकांशी वितुष्ट असते. कादंबरीत दक्षकन्या सतिवर दोनवेळा हल्ला करणारी व अधून मधून वावरणारी बुरखाधारी नाग व्यक्ती कथानकात रहस्य व उत्कंठा निर्माण होण्यास बर्‍याच वेळा हातभार लावते. जिचा उलगडा कादंबरीच्या दुसर्‍या भागात 'द सिक्रेट ऑफ नागाज' यामध्ये होईल. कथानकाचा मूळ ढांचा चांगला असल्यामुळे पुस्तक एक थरारक वाचनानंद नक्की देते. पुस्तकाच्या सुरुवातीच्या १०० पानांत अनुवादिका चाचपडत आहे असे वाटते, पण नंतर मात्र अनुवादिकेने चुका कमी करत नेत योग्य ती पकड वाचकाला मिळवून दिली आहे. 

ही कादंबरी वाचणार असाल तर थोड्या सूचना :
१. पहिली शंभर-सव्वाशे पाने नेटाने वाचावी लागतील
२. तांत्रिक चुका वा आजच्या काळातल्या मीटर, हेक्टर यांसारख्या वापरलेल्या परिमाणांकडे दुर्लक्ष करा
३. अनुवादिकेने या कादंबरीचा अनुवाद करण्यासाठी बरेच परिश्रम केले आहेत पण सुरुवातीला तिच्या अनुवादांमधील किरकोळ चुकांकडे प्रयत्नपूर्वक काणाडोळा करा. पुढील दोन्ही भागांचे अनुवाद याच अनुवादिकेने केले तर ती जास्त योग्य न्याय देऊ शकेल असे वाटते.
४. चिकित्सक भूमिकेतून हवे तर वाचा पण एक फिक्शन म्हणून वाचले तर कादंबरी खरोखर वाचनानंद देते.

मेलुहाचे मृत्युंजय या कादंबरीविषयी मी वर जे लिहिले आहे ते अर्थातच माझे वैयक्तीक मत आहे. कोणाचा अनुभव वेगळा असेल तर माहिती करुन घ्यायला अवश्य आवडेल. 

सिंहासन बत्तिशी

 


सिंहासन बत्तीशीचे प्रामाणिक भाषांतर असेच या पुस्तकावर छापले आहे. (म्हणजे नक्कीच काहीतरी गोंधळ नाही नाअसा चिकित्सक प्रश्न बाजूला ठेवूयात). 
पण मूळ 'सिंहासन बत्तिशीचा हा संक्षिप्त अनुवाद आहे हे उघड आहे. महाकवि गुणाढ्याने मूळ पैशाची भाषेत (या भाषेवर माहराष्ट्री प्राकृतचा बराच प्रभाव आहेलिहिलेल्या ‘बृहत्कथां’चे संस्कृत रुपांतर ११व्या शतकात सोमदेवभट्टाने 'कथासरित्सागर'च्या रुपाने केले होतेत्यात या सर्व कथा विस्ताराने आलेल्या आहेतसिंहासन बत्तिशीत थोड्या फार फरकाने याच सर्व कथा आलेल्या आहेत.  सिंहासन बत्तिशी चे संपादक ह.भावे यांनी संक्षेपाने या सर्व कथा दिलेल्या आहेतया पुस्तकाचे बलस्थान आहे त्या दोन गोष्टी - एक म्हणजे प्रस्तावना आणि दुसरे म्हणजे संक्षेपाने आलेल्या या ३२ कथांचे सार.

या पुस्तकाच्या प्रस्तावनेत ..भावे यांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहेती म्हणजे सिंहासन बत्तीशी हे मूळ कोणत्या भाषेत असावेया प्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्नडॉ.एडगर्टन यांना सिंहासन बत्तीशी च्या ज्या चार प्रती मिळालेल्या होत्या त्या मूळ माहराष्ट्री प्राकृतावरुन घेतल्या गेलेल्या होत्या.  सिंहासन बत्तीशीच्या या मराठी आवृत्तीच्या प्रस्तावनेत श्री..भावे यांनी सिंहासन बत्तीशीच्या मूळाचा शोध घेताना त्यांना मिळालेली माहिती दिली आहेत्यात ते म्हणतात"डॉ.एडगर्टन यांनी ज्या चार जैन हस्तलिखित प्रती तपासल्या त्यावरुन असे दिसते की कोणीक्षेमंकर मुनीने सिंहासन बत्तीशीची प्रत मूळ माहराष्ट्री प्राकृत वरुन सिद्ध केलेली आहेक्षेमंकर हा एक श्वेतांबर आचार्य होता  त्याने 'षट्पुरुषचरित्रनावाचा आणखी एक ग्रंथ लिहिला आहेमध्ययुगीन चरित्रकोशात या मुनीचा काळ ..१४७० चा सुमार असा दिला आहेसिंहासनावरील पुतळ्यांनी भोज राजाला या सर्व कथा सांगितल्या आहेतयाबाबत या सर्व प्रतींची एकवाक्यता आहेभोज परमाराचा (राजाचाकाल अंदाजे ..१०१० ते १०६० असा आहेसातव्या गोष्टींत हेमाद्रीच्या दानखंडाचा उल्लेख आला आहे. ... हेमाद्री उर्फ हेमाडपंत या देवगिरीच्या यादव सम्राटांचा मंत्रीयाचा अंदाजी काल १२६० ते १२७५ असा आहे
या उल्लेखावरुन सिंहासन बत्तिशीची रचना ही १३ व्या शतकाच्या अखेरीच्या सुमारास झाली असली पाहिजे असा तर्क श्री...भावे देतात.
पुढे प्रस्तावनेत श्री.भावे असेही म्हणतात की शालिवाहन शकाच्या पहिल्या शतकात महाकवि गुणाढ्याने कथासरित्सागरची रचना केलीया कथासरित्सागरमधील अनेक कथा सिंहासन बत्तीशीत जशाच्या तशा वा थोड्या फार फरकाने आल्या आहेतकथासरित्सागर आणि सिंहासन बत्तीशी हे दोन्ही ग्रंथ महाराष्ट्रात तयार झाले आहेत असे सिद्धही झाले आहे हेही ते सांगतातया सर्व कथांमधून भेटणारा विक्रमादित्य म्हणजे नक्की कोणयाविषयी संशोधकांत मतभेद आहेतकाहींच्यामते तो गौतमीपुत्र सातकर्णी असावाकाहींच्या मते चंद्रगुप्त विक्रमादित्य असावा.
वर दिलेली ही सर्व माहिती वाचून हा एडगर्टन म्हणजे नक्की कोणयाचा शोध घेता घेता कळाले की याचे पूर्ण नाव फ्रँकलीन एडगर्टन (Franklin Edgerton) आहेया फ्रँकलिन एडगर्टनने १९२६ साली 'विक्रमा' अ‍ॅडव्हेंचर्स ऑर  थर्टी टू टेल्स ऑफ  थ्रोन" (Vikrama's adventures: or, The thirty-two tales of the throne) हा ग्रंथ लिहिला होता.
या ग्रंथात आणखी सूर मारता मारता मला अशीही माहिती मिळाली की 'राजशेखर'ने लिहिलेला कर्पूरमंजिरी हा ग्रंथ देखील मूळ प्राकृत भाषेतच होताया कर्पूरमंजिरीचा काळ इसवीसन ९०० च्या सुमारासचा मानला जातो.
वरील माहिती  फ्रँकलीनच्या ग्रंथातील माहिती यावरुन असे स्पष्ट दिसते की प्राकृतातच विपुल साहित्य निर्माण झाले होते आणि तेच साहित्य संस्कृतातही भाषांतरीत होत होते.
प्रश्न हा आहे की माहराष्ट्री प्राकृत म्हणवल्या जाणार्‍या भाषेतच जर सिंहासन बत्तीशी  कथासरित्सागरासारखे अनमोल ग्रंथ तयार झाल्याचे सिद्ध होत असेल तर आजची मराठी भाषा ही तत्कालीन माहराष्ट्री प्राकृतचेच रुप नव्हे काय


वरील माहितीत श्री..भावे असे म्हणतात की सिंहासन बत्तीशीत आलेला हेमाद्रीच्या दानखंडाचा उल्लेख पाहता तो विजयनगर साम्राज्यातील हेमाडपंत असावापण या हेमाडपंतापूर्वी दुसरा हेमाद्री असू शकणार नाही कायहा एक विचार करण्याचा आणि संशोधनाचा मुद्दा आहेयाचे कारण असे की कथासरित्सागर शालिवाहन शकाच्या पहिल्या शतकात लिहिले गेलेतेही महाराष्ट्रातत्यातील अनेक कथा जर सिंहासन बत्तीशीत येत असतील आणि दोघांचा नायक विक्रमादित्य हाच असेल (हा विक्रमादित्य म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णीच असण्याची शक्यता जास्त आहेकारण या गौतमीपुत्र सातकर्णीने शकांचा पूर्ण नायनाट केला ज्याची साक्ष आजही नाशिक  परिसरातील आजही उपलब्ध असलेले अनेक शिलालेख देत आहेत.) तर या दोन ग्रंथांच्या काळात १२०० वर्षांचा फरक कसा
सिंहासन बत्तीशीतील हेमाद्री हा मला तेराव्या शतकातील हेमाडपंत वाटत नाही कारण कथासरित्सागरातील कित्येक कथा जशाच्या तशा त्यात किरकोळ फरकाने आल्या आहेतपहिल्या शतकातील कथासरित्सागर ते तेरावे शतक हा ,२०० वर्षांचा प्रदीर्घ काळ आहेज्यात प्रचंड बदल होतातपण सिंहासन बत्तीशीत असे मोठे बदल दिसत नाहीततेव्हा सिंहासन बत्तीशी ही कथासरित्सागराइतकी प्राचीन नसली तरी तिच्या जवळपास जाणारी कलाकृती असावीमला व्यक्तीशः सिंहासन बत्तीशीची निर्मिती ..३०० ते ४०० च्या काळातील वाटत आहेएडगर्टन साहेबांना जी माहराष्ट्री प्राकृताची सिंहासन बत्तीशीची प्रत सापडली ती कदाचित ..,३०० च्या अखेरीस कोणा विजयनगर साम्राज्याच्या प्रभाविताने लिहिलेली असावी आपल्या वेदपुराणे यांच्यातील घालघुसडीचा इतिहास पाहता हेमाद्रीच्या दानाचा उल्लेख त्यात घुसवणे काही अशक्य नाहीत्या उल्लेखावरुन सिंहासन बत्तीशीचा निर्मितीकालच ..तेराव्या शतकाच्या अखेरीसचा ठरवणे थोडे धाडसाचे ठरेलअर्थात हा संशोधनाचा भाग आहेजेवढे खणत जाऊ तितकी मुळे सापडत जातील
जिज्ञासूंनी फ्रँकलीन एडगर्टन साहेबांचा मूळ ग्रंथ येथून उतरवून घ्यावा  संदर्भासाठी पहावा
वादग्रस्त मुद्दे थोडे बाजूला ठेवले तरी सिंहासन बत्तिशी या ..भावे यांनी संपादित केलेल्या पुस्तकाचे महत्त्व खूप मोठे आहे.
जुन्या काळी ..जोगळेकर यांनी "सिंहासन बत्तिशीहा भलामोठा ग्रंथ लिहिला होताअलिकडेच पद्मगंधा प्रकाशनाने ..जोगळेकरांचाच दुसरा भलामोठा ग्रंथ 'गाथा सप्तशतिहा पुन्हा प्रकाशित केला आहेतसाच सिंहासन बत्तिशी हाही ग्रंथ प्रकाशित झाला तर वाचकांना या सर्व कथा विस्ताराने वाचता येतीलया ओघाने सिंहासन बत्तीशीत आलेल्या सर्व ३२ पुतळ्यांची नावेही आपल्याला कळतात.

तूर्तास वाचकांचे मनोरंजन करण्यास ,००० वर्षांपूर्वीच्या काळातील कथा ..भावे यांनी संपादित केलेले 'सिंहासन बत्तीशीहे पुस्तक समर्थ आहे असे मला वाटते  

-धन्यवाद

समथिंग - एक थरकापवणारी भयकथा

  पुस्तकाचे नाव : समथिंग लेखक : सुहास शिरवळकर मला समथिंग का आवडते त्याची अनेक कारणे आहेत. १. इतर भयकथा मधून जे दिसते ते हिरवे ड...